सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकांची एन्ट्री
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासाला वेग आला आहे. तपासासाठी स्थानिक आणि गुन्हे शाखेची १५ पथकं नेमण्यात आली आहे. सध्या सैफच्या घरातून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या हाताचे ठसे गोळा करण्यात आले आहे. काही दिवसांपासून सैफच्या घरात फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं. त्यासाठी येणाऱ्या कामगारांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सैफच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. इमारतीत स्वयंचलित गेट आणि कडक सुरक्षा व्यवस्था असताना अज्ञात व्यक्ती १२ व्या मजल्यावर कशी पोहोचली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आता दया नायक या प्रकरणातील तपास करतील. काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास दया नायक यांच्याकडे होता.
दया नायक १९९५ मध्ये पोलीस भरतीत पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काऊंटर पथकात होते. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर दया नायक यांची पहिली पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यात झाली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री दया नायक ड्युटीवर होते. यादरम्यान त्यांना छोटा राजन गँगच्या दोन गटांची माहिती मिळाली. दया जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी दया यांच्यावर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल दया यांनी दोन्ही गँगस्टरांवर गोळ्या झाडल्या. यात दोघांचा मृत्यू झाला. हा दया यांचा पहिला एन्काऊंटर होता. यानंतर दया घाबरले होते. विभाग त्यांना निलंबित करेल अशी त्यांना भीती होती. आतापर्यंत दया नायक यांनी ८७ हून जास्त एन्काऊंटर केले आहेत. दया यांनी १९९९ ते २००३ दरम्यान दाऊदचा भाऊ छोटा राजन याच्या गँगलाही संपवलं होतं.