सासवड पोलिसांची धडक कारवाई; घड्याळ चोरीच्या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच केले जप्त

Spread the love

सासवड पोलिसांची धडक कारवाई; घड्याळ चोरीच्या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच केले जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

सासवड – घडाळ चोरीच्या आरोपावरून एका आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडून अधिक तपास केला असता, पोलिसांनी तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. गणेश मंजाप्पा (३०) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. वल्लकोंडा राजानरसिंमा रेडी (२०) या सॉफ्टवेअर इंजिनिअरने सासवड पोलीस ठाण्यात घटनेची फिर्यादी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हडपसर मगरपट्टा येथील कंपनीत नोकरीस असून, १ जानेवारी रोजी सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या मित्रासह सासवड येथील संगमेश्वर मंदीरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर सासवडवरून हडपसरला जाण्यासाठी सासवड येथील पीएमटी बसमध्ये बसले. तसेच तिकीट काढण्यासाठी बॅग चेक केली असता बॅगची चैन कोणीतरी उघडली असल्याचे लक्षात आले. तसेच बॅगमध्ये ॲपल कंपनीचे घड्याळ व पाकीटातील क्रेडीट कार्ड, आयकार्ड, पॅन कार्ड, डेबिटकार्ड, आणि रोख २ हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले.

त्यामुळे त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपीचे लोकेशन घेतले असता आरोपी पुरंदर हायस्कूल समोरील झोपडपट्टी मध्ये आढळून आला. त्याठिकाणी पाहणी केली असता सदर आरोपी आढळून आला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून अधिक तपास केला असता तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच चोरल्याचे उघड झाले. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस हवालदार सुरज नांगरे, रुपेश भगत, आबासो बंकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरडे, अक्षय चिले, प्रणय मखरे, विकास ओमासे, तुषार लोंढे यांच्या पथकाने कारवाई केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरघे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon