बाप नावाचा सैतान ! पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यात मुली व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार, बलात्कार वाढत असून कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना मुंबईतील वडाळा परिसरात घडली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांनी गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच वडिलांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळ्यात पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांकडून गैरवर्तन केले जात होते. १६ वर्षीय मुलगी झोपेत असताना वडिलांकडूनच मुलीला चुकीचा स्पर्श केला जात होता. मुलीने याबाबत कोणाला सांगितल्यास तिला नग्न घराबाहेर काढण्याची धमकी आरोपी वडिलांकडून दिली जात होती. त्यामुळे मुलगी प्रचंड मानसिक तणावामध्ये होती.
सदर घडलेल्या घटनेमुळे मुलगी अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होती. दरम्यान चर्चमध्ये मुलीने आपबिती सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला आहे. मुलीने वडिलांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक तपास करत आहेत.