कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचे प्रकरण; पुणे पोलिसांनी कट उधळला, पिस्तुलासह दोघांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – वर्षाच्या आत कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याचा रचलेला कट पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उधळला आहे. दोन पिस्तुलधारी तरुणांना युनिट दोनच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र नेमका ‘गेम’ कोणाचा होणार होता हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे शहरातील सर्वच टोळ्यांचे म्होरके पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत असून, तेही या हत्येच्या बदल्यासाठी दोघांच्या निशाणा कोणावर होता, हे समजण्यासाठी देव पाण्यात ठेवून आहेत. पण तो गुन्हेगारीतील बडा मासा असल्याचे बोलले जात आहे. संदेश लहू कडू (२४) आणि शरद शिवाजी मालपोटे (२९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अमोल सरडे, निखिल जाधव, उज्वल मोकाशी यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या वर्षी ५ जानेवारी २०२४ रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा कोथरूड येथील सुतारदरा येथे राहत्या घरा समोर तिघांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. घटनेला उद्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र एक वर्षाच्या आत शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा मोठा कट रचण्यात आला आहे. त्यासाठी मोठी प्लॅनिग देखील करण्यात आले. पिस्तुलांची जमवाजमव देखील केली गेली. आता उद्यापर्यंत “त्या”ला ठोकायचे अशी तयारी केलेली असतानाच ही खबर गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी लागलीच याचा माग काढण्यास सुरुवात केली. तेव्हा कोथरूडमधील रहिवाशी असलेले शरद मालपोटे आणि संदेश कडू यांची माहिती मिळाली. दोघांनी पिस्तुल व काडतुसे आणून ठेवली आहेत, असे समोर आले. या दोघांचा युद्ध पातळीवर शोध घेऊन अखेर आज त्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले. पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहींम राबवल्याने खुनाचा कट उधळला गेला आहे. दरम्यान शरद मोहोळ खूनात पोलिसांनी १७ आरोपी निष्पन्न केले. त्यात मुळशीतील विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. गुंड विठ्ठल शेलारसह १७ जनांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व सध्या कारागृहात आहेत.
पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटातील दोघांना पकडले आहे. पण आणखी साथीदार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांना पकडेपर्यत कट पूर्ण उधळला असे म्हणता येणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे कधी बदला पूर्ण होऊ शकतो अशीही शक्यता आहे. शरद मोहोळ कुख्यात गुंड होताच पण तो एका टोळीचा म्होरक्या देखील होता. परंतु त्याचाच गेम झाल्यानंतर ही टोळी लयास गेली आहे. प्रतिस्पर्धी टोळीचा प्लॅन सक्सेस झाला असेही बोलले जात होते. त्यामुळे आताच कट देखील गुन्हेगारीतील मोठा मासाच टार्गेट होता, अशी माहिती आहे. परंतु तो कोण असा प्रश्न आता गुन्हेगाराणा पडला आहे. आपसूकच नाव समोर येईपर्यंत सर्वांची झोप उडालेली असणार आहे.