नागपुरात रक्तरंजित थरार; सख्या मामानेच केली दोन भाच्यांची हत्या, पोलीसांनी आरोपी मामाला ठोकल्या बेड्या

Spread the love

नागपुरात रक्तरंजित थरार; सख्या मामानेच केली दोन भाच्यांची हत्या, पोलीसांनी आरोपी मामाला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे/वार्ताहर 

नागपुर – सर्वच नाती चांगली असतात असं नाही. कधी कधी नात्यातही दुरावा निर्माण होतो. एवढंच कशाला नात्यातील मंडळीही एकमेकांच्या जीवावर उठलेली आपण पाहतो. कुणी मुलाचा खून केला, तर कुणी आईवडिलांची हत्या केली अशा घटना आपण नेहमीच वाचत असतो. मालमत्तेचा वाद, पैशाचा वाद, तर कधी क्षुल्लक कारणावरूनही अशा हत्या होत असल्याचं आपण वाचत असतो. नागपुरातही अशीच एक घटना घडली आहे. मामानेच दोन भाच्यांची हत्या केल्याने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. याप्रकरणी मामा अटकेत आहे. पण दोन भाचे जीवानीशी गेले त्याचं काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या गांधीबाग गार्डनजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचं नाव बदन सिंह असं आहे. आरोपी हा मृतक रवी राठोड आणि दीपक राठोड यांचा मामा आहे. रवी आणि दीपक हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर आरोपी बदन सिंह हा त्यांचा दूरचा मामा आहे. दोघे भाऊ शहरातील हंसापुरी भागात राहायचे. दोघेही आरोपीकडून बांगडी खरेदी करून त्या शहरात विकायचे, अशी माहिती मिळते.

आरोपी मामा बदन सिंह याचा बांगडी विक्रीचा होलसेलचा व्यवसाय आहे. त्यामुळे रवी आणि दीपक हे मामाकडून बांगडी विकत घ्यायचे आणि शहरात जाऊन ते विकायचे. त्यातून त्यांना चांगली मिळकतही व्हायची. कधी कधी दोघे मामाकडून उधारीवर बांगड्या खरेदी करून त्याची विक्री करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे उधारी राहिली होती. ही उधारी लवकरात लवकर फेडावी म्हणून बदन सिंह हे दोघाांकडे तगादा लावायचे. त्यामुळे दोघांमध्ये कुरबुर झाली. त्यातूनच ही हत्या घडल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी मध्यरात्री गांधीबाग येथील काली माता मंदिर समोर ही घटना घडली. मामा आणि भाच्यांमध्ये आर्थिक व्यवहारावरून शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक चकमकीवरून प्रकरण हाणामारीवर आलं. त्यातूनच आरोपी बदन सिंह याने रवीवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे रवी जागेवरच कोसळला. मामाने भावावर हल्ला केल्याने दीपकने भावाला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे मामाने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. त्यात दीपक गंभीर जखमी झाला. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच रवीचा मृत्यू झाला. तर दीपकचा आज पहाटे ४ वाजता मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला तात्काळ अटक केली आहे. त्याच्याकडील शस्त्रही पोलिसांनी जप्त केलं आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. तसेच दीपक आणि रवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान, या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातील क्रोर्य पाहून सर्वचजण हादरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon