मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी पैसे वाटले? सोशल मीडियावर वीडियो वायरल

Spread the love

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी पैसे वाटले? सोशल मीडियावर वीडियो वायरल

योगेश पांडे/वार्ताहर 

जालना – सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा जोर वाढला आहे. सभेतील गर्दीवरुन, जमावावरुन आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. गर्दी जमविण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी लोकांना पैसे दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. जालन्यातील घनसावंगीतील मुख्यमंत्र्याच्या सभेदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी लोकांना पैसे दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातील शिवसेनेच्या हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या प्रचार सभेच्या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केल्या जात आहे. या सभेला लोकांना पैशाचे आमिष दाखवून गर्दी जमवण्यासाठी सभेला येणाऱ्या गाड्यांना प्रत्येकी डिझेलची पावती आणि एक हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

घनसावंगीत राष्ट्रवादीच्या राजेश टोपे विरुद्ध शिंदे गटाच्या हिकमत उढाण अशी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र भाजपच्या सतीश घाटगे यांनी बंडखोरी करत महायुतीला आव्हान दिल्याने या मतदारसंघात राजेश टोपे विरुद्ध भाजप बंडखोर घाटगे अशी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon