अभिनेते शाहरुख खानला धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; रायपूरमधून वकील फैजान खानला अटक

Spread the love

अभिनेते शाहरुख खानला धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; रायपूरमधून वकील फैजान खानला अटक

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – मुंबईतील वांद्रे पोलिसांच्या लँडलाइनवर फोन करून अभिनेता शाहरुख खानकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वकील फैजान खानला पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीगडमधील रायपूर इथून त्याला अटक करण्यात आली. फैजानला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यासाठी पोलीस ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण केली असून आज कोर्टात हजर करण्यात आले. ५ नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात धमकीचा फोन आला होता. तेव्हापासूनच पोलीस याप्रकरणाचा तपास करत होते. या तपासात फैजानबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलीस ठाण्यात धमकीचा फोन करण्यासाठी त्याचा मोबाइल फोन वापरला जात असल्याबद्दल त्याला विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना त्याने घटनेच्या काही दिवस आधी २ नोव्हेंबर रोजी आपला मोबाइल फोन चोरीला गेल्याचं पोलिसांना सांगितलं. मुंबईत चौकशीदरम्यान आरोपीचा हेतू स्पष्ट होईल, असं मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सांगितलं आहे. धमकीचा कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाइल नंबरवरून अधिकाऱ्यांनी फैजान खानचा शोध घेतला. वांद्रे पोलीस ७ नोव्हेंबर रोजी रायपूरला त्याच्या चौकशीसाठी रवाना झाले होते. मात्र फैजानने सांगितलं की त्याचा मोबाइल फोन २ नोव्हेंबर रोजी चोरीला गेला होता. त्यानंतर त्याने स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलिसांच्या एफआयआरमध्ये असं नमूद केलंय की कॉलरने शाहरुख खानकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

बँडस्टँड इथल्या मन्नत बंगल्यात राहणाऱ्या शाहरुख खानने मला ५० लाख रुपये दिले नाही तर मी त्याला मारून टाकेन”, अशी धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. पोलीस हवालदार संतोष धोडके यांनी फोन करणाऱ्याची ओळख आणि ठिकाणाबद्दल चौकशी केली असता धमकी देणाऱ्याने म्हटलं, “त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला काही लिहायचं असेल तर माझं नाव हिंदुस्थानी असं लिहा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon