अजित पवारांना मोठा धक्का! सिडकोच्या माजी संचालकांनी घेतला मोठा निर्णय, कुटुंबासह पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून नवीन वर्षात १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज राज्यातील २८७ नगरपालिकांचा निकाल जाहीर होत असताना नवी मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. नवी मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मोठा धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या कुटुंबासह पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. नामदेव भगत यांच्या पत्नी इंदुमती भगत, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष धीरज कोळी, युवक कार्याध्यक्ष संजय कांबळे तसेच त्यांच्या पक्षाचे अनेक समर्थक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. रबाले येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे अजित पवार गटाला नवी मुंबईत मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच नामदेव भगत यांची कन्या पुनम मिथुन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला होता. त्यामुळे भगत कुटुंबातील राजकीय हालचालींमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे. निवडणुकीआधी घडणाऱ्या या पक्षांतरामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी काळात आणखी काही नेतेमंडळी पक्ष बदलतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.