राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांत महायुतीची सरशी; मविआत काँग्रेस आघाडीवर
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई — राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घेण्यात आल्या. निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीने ठोस यश मिळवत स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली पकड मजबूत केली असून, महाविकास आघाडीत काँग्रेसने तुलनेने चांगली कामगिरी केली आहे.
भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीने राज्यभर आक्रमक प्रचार केला होता. त्याचा परिणाम निकालांत स्पष्टपणे दिसून आला. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून पक्षाचे १२० नगराध्यक्ष निवडून आले आहेत. ही भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम नगरपालिका कामगिरी मानली जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात भाजपने प्रभावी मुसंडी मारली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही दमदार कामगिरी करत ५४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद पटकावले.
सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजप आणि शेकापच्या पॅनेलचा पराभव केला. कोकणात रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वर्चस्व राखले. सोलापूर जिल्ह्यात सहा, नाशिकमध्ये ११ पैकी पाच, तर पालघर जिल्ह्यात पालघर आणि डहाणू येथे शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ४० नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले. पुणे जिल्ह्यातील ‘होम ग्राऊंड’वर पक्षाने १७ पैकी १० ठिकाणी विजय मिळवला. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि पाचगणीत पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले. कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यांतही राष्ट्रवादीला यश मिळाले.
महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक चांगली कामगिरी केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ३४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले, तर अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पक्षाचे उमेदवार विजयी झाले. एकूणच या निकालांतून राज्यातील स्थानिक राजकारणात महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.