धक्कादायक ! बालविवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांवर गुन्हा; नवऱ्यासह सासू, सासरेही तुरुंगात, पुण्यात गरोदर अल्पवयीन मुलीचे धाडस
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना पुण्यात मात्र धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपला बालविवाह लावून देणाऱ्या आपल्या आई-वडिलांसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केल्याचा धाडसी प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पीडित मुलीच्या पतीसह सासर व माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही १७ वर्षांची असताना तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह एका २२ वर्षीय तरुणाशी लावून दिला होता. त्यानंतर तिच्या पतीने ती अल्पवयीन असल्याचे ठावूक असतानाही तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले होते. हा प्रकार असह्य झाल्यामुळे पीडितेने सिंहगड रोड पोलिसांकडे धाव घेऊन आपल्या पतीसह सासर व माहेरच्या नातलगांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार या प्रकरणी मुलीचा पती (२२), सासरे (४६), सासू (४२), वडील (४५) व आई (३८) यांच्याविरोधात बलात्कार, पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमताने अल्पवयीन पीडितेचा विवाह लावून दिला. त्यानंतर पतीने वारंवार तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यामुळे ती गरोदर राहिली. त्यातून तिला त्रास उद्भवू लागल्यामुळे तिने पोलिसांत धाव घेतली. पोलीस याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर करत आहेत.