धक्कादायक ! पुण्यात ५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा, कोंढव्यातील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारीचे शहर म्हणून ओळखले जात आहे. पुण्यात दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर मुली, महिलांवर अत्याचार होत असताना आता तर मुलांवर देखील अत्याचार होत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. पाच वर्षीय मुलाला मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून तीन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना कोंढवा येथील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दहा, अकरा आणि तेरा वर्षाच्या तीन मुलांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
ही मुले एकाच सोसायटीमध्ये राहणारी आहेत. त्यातील एका मुलाने पालकांचा मोबाइल आणला होता. टेरेसवर खेळत असताना तेथे पीडित मुलगा आला. त्याला तिघांनी व्हिडिओ दाखवला. यानंतर त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखे कृत्य केले. हे कृत्य ते मागील दोन महिने करत होते. पीडित मुलाने त्रास झाल्यावर घरी ही घटना सांगितली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख हे अधिक तपास करीत आहेत.