उल्हासनगरमध्ये रुग्णालयात आरोपीने केला रुग्णावर हल्ला; रुग्ण गंभीर जखमी, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर – राज्यात सर्वत्र गुन्हेगारी वाढत असताना उल्हासनगरमध्ये मध्यंतरी महिला पोलीसावर हल्ला करण्यात आला होता, ही घटना ताजी असतानाच आता एका आरोपीने रुग्णालयात चक्क रुग्णावर हल्लाबोल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णावर त्याच आरोपीने हल्ला केला. यात रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बाबासाहेब सोनावणे याने ब्लेडने हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. हल्ला करताना बाबासाहेब सोनावणे हा देखील जखमी झाला होता. यामुळे त्याच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान यावेळी त्याच्या बाजूच्या बेडवर उपचार घेत असलेल्या सलमान सय्यद या तरुणावर आरोपी बाबासाहेब सोनावणे याने चक्क स्टीलच्या खुर्चीने हल्ला केला.
सलमान सय्यद याच्या डोक्यात, तोंडावर खुर्चीने प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. आरोपी बाबासाहेब सोनवणे हा वेडसर असल्यासारखा वागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.