क्रिप्टो करन्सी फसवणूक करणारे दोन भामटे खेड पोलिसांकडून जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
खेड – राज्यात सायबर भामटे दिवसेंदिवस शेकडो नागरिकांची फसवणूक करीत आहेत. पोलिसांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक आमिषाला बळी पडून आपली आर्थिक फसवणूक करून घेत आहेत.रत्नागिरीत अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीपैंकी यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे अजूनही साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरत, गुजरात राज्यातून बनावट ट्रेडिंग ऍप्लिकेशनचा व क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून २४ लाख ८५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले. या प्रकरणात आता संशयितांची संख्या ४ इतकी झाली आहे. जिम्मीभाई सुनिलभाई भगत (४०, रा. मोटिशेरी गलमांडी सुर गुजरात) व सोनू रामलाल टेलर (२४, रा. दिनोडली गाव, सुरत, गुजरात) अशी त्या मुसक्या आवळण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. १९ एप्रिल ते मे २०२४ या कालावधीत एआरके लर्निंग ग्रुप या व्हॉटसऍप ग्रुपवरील ट्रेडिंग संदर्भातील गोष्टी मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉटसऍप मेसेजद्वारे फिर्यादी यांना एआरके इन्व्हेस्टमेंट ग्रुप या कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रक्कमेचा परतावा देण्यात येईल, असे सांगून खेडमधील एका तरूणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती.
या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरत गुजरात येथून बनावट ट्रेडिंग ऍप्लिकेशनचा वापर करून व क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून व सिमकार्ड क्लोन ऍप्लिकेशन करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. या गुन्ह्यामध्ये यापुर्वी नीरज महेंद्र जांगरा (२३, रा. चंदिगढ) व नारायनलाल शंकरलाल जोशी (४७, रा. भावना पार्क १ सुरत गुजरात) यांना यापूर्वी अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी यांचे अन्य साथीदार यांचा तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे जिम्मीभाई सुनिलभाई भगत, सोनू रामलाल टेलर यांना १२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.