नगरमध्ये अनेक बोगस लष्करी संस्थाचा पर्दाफाश; लष्करात भरतीचे आमिष दाखवून शेकडो तरुणांची फसवणूक करणारा जेरबंद

Spread the love

नगरमध्ये अनेक बोगस लष्करी संस्थाचा पर्दाफाश; लष्करात भरतीचे आमिष दाखवून शेकडो तरुणांची फसवणूक करणारा जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

अहमदनगर – लष्करात भरती करण्याच्या नावाखाली अनेक संस्था नगर परिसरात कार्यरत आहेत. प्रत्येक तरुणाला वाटते की, आपण लष्करात भरती होऊन देशसेवा करावी याचाच फायदा घेऊन काही बोगस संस्था लष्कराच्या नावाने बेरोजगार तरुणांची फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. लष्करात भरती करून देतो असे सांगत तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले. सत्यजित भरत कांबळे (रा. श्रीगोंदा, जि. नगर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. तो लष्करी अधिकारी असल्याचे सांगत युवकांना लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भिंगार कॅम्प पोलिसांच्या मदतीने पुण्याच्या मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमानने ही कारवाई केली.

नगर शहर व परिसरात भारतीय लष्कराच्या संस्था आहेत तसेच छावणी मंडळही आहे. अशा संस्थांत युवकांना नोकरी मिळवून देतो. असे सांगत फसवणूक करणारी टोळी भिंगार कॅम्प पोलिसांच्या गळाला लागली आहे. या टोळीतील एका आरोपीला आज पोलिसांनी जेरबंद केले. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील शंभरहून अधिक युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखविण्यात येत होते. त्यासाठी देहरादून व नगर जिल्ह्यात बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारून बनावट भरती केली जात होती.

सैन्यात मेजर पदावर नोकरीला असल्याचे भासवून फसवणूक

नगर शहरातील सैन्य क्षेत्र असलेल्या जामखेड रस्त्यावरील मुठी चौकात ६ फेब्रुवारी ते २८ मे २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. नाशिक जिल्ह्यातील पास्ते गावच्या भगवान काशिनाथ घुगे व हजारो युवकांना सत्यजित कांबळे, बापू छबु आव्हाड (रा. आंबेगाव, ता. येवला, जि. नाशिक), राहुल सुमंत गुरव (रा. चौसाळा, जि. बीड) या तीन आरोपींनी सैन्यात मेजर पदावर नोकरीला असल्याचे भासवून नोकरी देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे समोर आले. याची माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलीस व पुण्याच्या मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमानच्या पथकाने कारवाई करण्यासाठी निघाले. सत्यजित कांबळे दिल्ली येथे राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक दिल्लीत शोध घेत होते. पथक दिल्लीत आल्याचे कळताच आरोपी कांबळेने महाराष्ट्रात पलायन केले. पथकाने त्याचा शोध घेत बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे सापळा रचून त्याला शिताफीने पकडले. त्याने पथकाकडे इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. यामध्ये एक महिला दलालही सामिल असल्याचा संशय पथकाला आहे. ही टोळी प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये उकळत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. सत्यजित कांबळे याचा साथीदारांचा तपास पथक करत आहे.

अशी करत होते फसवणूक पद्धत

आरोपी हे सैन्य भरती प्रक्रिया सुरू होण्यात पूर्वी प्रशिक्षण केंद्रात संपर्क साधून युवकांना गळाला लावायचे. देशातील विविध राज्यातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये संपर्क करुन युवकांना देहरादून व नगर येथील सैन्य परिसरात बोलावले जायचे. युवकांना प्रशिक्षण देऊन व पैसे देण्याऱ्या उमेदवारांना सेना दलातील मुख्य अभियंता अधिकारी आणि सेवानिवृत्त दक्षिणी कमान मुख्यअधिकारी यांच्या नावाने बनावट नियुक्ती पत्र दिली जायची. युवकांची खात्री पटावी यासाठी त्यांनी जंगली भागात बनावट प्रशिक्षण शिबिरे घेतली जात होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon