पुण्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह? कोयता गँगच्या टोळीला पकडायला गेलेल्या एपीआय वर जीवघेणा हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरिक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी जालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचं नाव आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला, त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या रत्नदीप गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
निहाल सिंग नावाच्या आरोपीने एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला. निहाल सिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने याआधीही पोलिसांवर हल्ले केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्यावेळी दुसरा आरोपी राहुल सिंगही तिथे होता, तोही रेकॉडवरील आरोपी आहे. या दोघांकडे यापूर्वी अवैध पिस्तुल देखील आढळून आलं होतं. दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू असताना एपीआय गायकवाड आरोपींना पकडायला गेले होते, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरच हल्ला केला. पुण्याच्या रामटेकडी भागात दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली आहे. कोयता गँगच्या रडारवर पोलीसच आल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
याआधीही पुण्यात कोयता गँगने मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची शहरातून धिंडही काढली होती. पण आता कोयता गँगने थेट पोलिसांवरच हल्ला केल्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.