शॅम्पू आणि डियोड्रेंटच्या बॉटलमध्ये सपडले २० कोटिचे कोकेन; परदेशी महिलेला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – कडेकोट बंदोबस्त असूनही विमानतळावरुन सोने, ड्रग्जची तस्करी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. तस्करी करण्यासाठी गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या वापरताना पाहायला मिळतात. मात्र, कितीही नवीन आयडिया वापरली तरी सीमा शुल्क विभागाच्या तावडीत सापडतातच. अशाच एका प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली. तस्करी करण्यासाठी तिने जी शक्कल लढवली होती, त्याने कुणालाही शंका येणार नाही. मुंबई विमानतळावर एका परदेशी महिला प्रवाशाला कोकेनसह अटक करण्यात आली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. परदेशी महिलेकडून १९ कोटी ७९ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेली महिला नैरोबीहून मुंबई विमानतळावर पोहोचली होती. तिच्याकडे सिएरा लिओनचे नागरिकत्व आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी महिलेच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली. या काळात अधिकाऱ्यांना जे आढळून आले ते धक्कादायक होते. महिलेच्या सामानात शूज, मॉइश्चरायझर, शॅम्पू आणि डियोड्रेंटच्या बाटल्या आढळून आल्या. या सर्व वस्तू सामान्यापेक्षा जड होत्या. या संशयित वस्तूंची कसून तपासणी केली असता महिलेच्या पिशवीतून काढलेल्या वेगवेगळ्या बाटल्या आणि शूजमध्ये पांढऱ्या पावडरसारखे काहीतरी लपवून ठेवलेले आढळून आले. फील्ड टेस्ट किट वापरून पांढऱ्या पावडरची तपासणी केली असता, त्यात कोकेन असल्याचे आढळून आले. महिलेच्या बॅगेतून सुमारे १.९७९ किलोग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. परदेशी महिलेच्या बॅगेतून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची बाजारातील किंमत सुमारे १९.७९ कोटी रुपये आहे. यानंतर महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.