बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खानला मातृशोक; काही दिवसांपूर्वीच साजरा केला होता आईचा ७९ वा वाढदिवस
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांची आई मनेका इराणी यांचं शुक्रवारी, २६ जुलै रोजी मुंबईत निधन झालं. फराह खान यांच्या आईचं वय ७९ वर्ष होतं. मेनका या बालकलाकार डेझी इराणी आणि हनी इराणी यांची बहीण होती. त्यांनी १९६३ मध्ये ‘बचपन’ या चित्रपटात अभिनेत्री म्हणूनही काम केलं आहे. या चित्रपटात सलमान खानचे वडील सलीम खान देखील होते. नंतर त्यांनी चित्रपट निर्माता कामरानशी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीपासून कायमच्या दूर गेल्या. वृत्तानुसार, मनेका काही दिवसांपासून आजारी होत्या. आजारपणामुळेच त्यांचं निधन झालं. दिग्दर्शक फराह खान यांनी आजवर बॉलिवूडचे अनेक सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. त्यांची आई मनेका इराणी देखील अलीकडेच फराह खानच्या व्लॉगमध्ये दिसल्या होत्या. फराह आणि साजिद यांच्या वडिलांचं आधीच निधन झालं आहे. आता त्यांच्या डोक्यावरून आईचंही छत्र हरपलं आहे. फराह खान यांच्या आईच्या मृत्यूवर सेलिब्रिटी देखील शोक व्यक्त करत आहेत.
फराह खानने दोन आठवड्यांपूर्वीच तिच्या आईचा ७९ वा वाढदिवस साजरा केला होता. फराहने हे फोटो पोस्ट केले होते. त्यांनी आईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटलंय की, ‘आम्ही सर्वजण आपल्या आईला गृहीत धरतो, विशेषत: मी. पण आता मला समजलंय की मी तिच्यावर किती प्रेम करते… ती मला भेटलेली सर्वात मजबूत, धाडसी व्यक्ती आहे. अनेक शस्त्रक्रियांनंतरही तिची विनोदबुद्धी कायम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!’ असं फराह खान म्हणाल्या होत्या. फराह खानचे वडील कामरान खान हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. साजिद खाननं ‘बिग बॉस १६’ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूविषयी खुलासा केला होता. त्यानं सांगितलं होतं की, ‘एका काळानंतर त्यांचे चित्रपट कसे फ्लॉप होऊ लागले. त्यानंतर त्यांनी सर्व पैसे ड्रग्ज आणि दारूवर उडवले. त्यांना दारूचं व्यसन जडलं होतं. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. यावेळी त्यांच्या खिशात फक्त ३० रुपये होते. त्यांच्या अंत्यविधीसाठीही साजिद आणि फराहकडे पैसे नव्हते.