थरारक ! चोरट्यांचा पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न, तर पोलिसांचा गोळीबार; पुण्यातील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत.सांस्कृतिक व विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे, मात्र अलीकडच्या काळात वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटना घडत असलेल्या दिसून येत आहेत. असाच एक प्रकार आता नवले पूलाजवळील वंडरसिटी परिसरात घडला आहे. रविवारी रात्री काही चोरट्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी पोलिसांकडूनही चोरट्यांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी चोरट्यांच्या दिशेने पोलिसांनी गोळीबार केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोळी हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. रविवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी आणि पोलिसांचे पथक बाह्यवळण मार्गावर गस्त घालत होते. त्या वेळी वंडरसिटी भागात एका मोटारीजवळ तरुण थांबले होते. ते मोटारीतील डिझेल काढून घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी पाहताच दोघे तरुण मोटारीतून पळून जात होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. उपनिरीक्षक कोळी यांनी प्रसंगावधान राखून चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. चोरटे नवले पुलाकडे पसार झाले. या प्रकरणी उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी फिर्याद दिली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.