मी मालक बोलतोय असे भासवून ४० लाखांचा गंडा, डेक्कन जिमखाना पोलिसांत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात सध्या गुन्हेगारीने डोकं वर काढले आहे. सांस्कृतिक पुण्याची वाटचाल गुन्हेगारीने सुरू आहे. अशीच एक घटना डेक्कन परिसरात घडली आहे. मी कंपनीचा मालक बोलत असल्याचे भासवून कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडले. कंपनीच्या बँक खात्यातून एकूण ४० लाख ६० हजार रुपये पाठवण्यात आले. याबाबत आशिष राजीव बोडस (वय- ३९, रा. प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादवी कलम ४१९, ४२० सह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी संगनमत करुन डेक्कन परिसरातील एका कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या आशिष बोडस यांना व्हॉट्सअँप कॉल केला. मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. कृपया व्हॉट्सअँप मेसेज तपासा आणि सांगितल्याप्रमाणे करा, असे सांगून फोन कट केला. व्हॉट्सअँप पाहिले असता खालील बँक खात्यावर सांगितल्याप्रमाणे ४० लाख ६० हजार ९०९ रुपये ट्रान्सफर करा असे सांगण्यात आले होते. फिर्यादी यांनी त्या क्रमांकावर पुन्हा फोन केला असता सायबर गुन्हेगारांनी फोन कट केला. मीटिंगमध्ये असल्या कारणाने फोनवर बोलता येणार नाही असा मेसेज केला. फिर्यादी यांना विश्वास बसल्याने त्यांनी पैसे ट्रान्सफर केले.मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. पुढील तपास डेक्कन जिमखाना पोलीस करीत आहेत.