झोपेत बिछाना ओला केला म्हणून पोरीला आईने दिले चटके, प्रायव्हेट पार्टही भाजला; महिले विरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लहान मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, यासाठी पालक त्यांना शिस्त लावतात. पण काही वेळेला शिस्तीचा एवढा अतिरेक होतो की त्यामध्ये मुलांचं बालपण होरपळतं. अशीच एक घटना मुंबईच्या गोवंडीमध्ये घडली आहे. तेथे एक महिलेने तिच्या पोटच्या पोरीला अंगावर चटके दिले, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे. आणि या शिक्षेचं कारण काय, तर त्या निरागस मुलीने झोपेत बिछाना ओला केला म्हणून… त्या महिलेने तिच्या पोटच्या लेकीला मारलं आणि एक भांड गॅसवर तापवून त्याच्या सहाय्याने त्या मुलीच्या पाठीवर, मांड्यावर आणि प्रायव्हेट पार्टवरही चटके दिले. गोवंडीतील महिलच्या या निर्दयी कृत्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूर हल्ल्याच्या वेळी आरोपी महिलेचा पती, त्या मुलीचे सावत्र वडील कामावर गेले होते. चटके बसल्यावर मुलगी वेदनेने व्हिवळू लागली, ओरडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले पण आरोपी महिलेने शेजाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे आमचं कौटुंबिक प्रकरण आहे, तुम्ही यात ढवळाढवळ करू नका, असा इशाराही तिने दिला. अखेर शेजाऱ्यांनी आपत्कालीन १०० क्रमांकावर कॉल करून ही बाब पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली आणि आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या सांगण्यांनुसार, ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली ती पीडित मुलीची शेजारी आहे. ही मुलगी गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात तिची आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. आरोपी महिलेला आधीच्या पतीपासून दोन मुली असून दुसऱ्या पतीपासून देखील दोन मुलं आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि त्यांनी पीडित मुलीला लगेच रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. याप्रकरणी त्या आरोपी महिलेला अद्याप अटक करण्याच आलेली नाही, मात्र तिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.