१९९३ च्या दंगलीतील आरोपीला तब्बल ३१ वर्षांनंतर अटक; रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांकडून बेड्या

Spread the love

१९९३ च्या दंगलीतील आरोपीला तब्बल ३१ वर्षांनंतर अटक; रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांकडून बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या दंगलीतील संशयीत आरोपीला ३१ वर्षांनंतर पुन्हा अटक करण्यात रफी अहमद किडावाई (आरएके) मार्ग पोलिसांना यश आले. आरोपीला शिवडी येथून अटक करण्यात आली. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या दंगलीत आर. एके. मार्ग पोलीस ठाण्यात सय्यद नादीर शहा अब्बास खान (६५) याच्या विरोधात भांदवि कलम १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८ ,१४९, ३०७,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे वय ३१ वर्ष होते. शिवडी येथील लांजेकर मार्ग येथे राहणाऱ्या खानविरोधात सत्र न्यायालयात खटला सुरू होता. पण जामिनावर सुटका होताच आरोपी गायब झाला होता. त्यावेळी सत्र न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

अनेक वर्षे लोटल्यानंतरही आरोपी न सापडल्यामुळे पोलिसांनी ईस्माईल इमारतीतील त्याच्या घरावर पाळत ठेवली होती. पोलीस वारंवार त्याच्या घरी जाऊन कुटुंबियांकडे चौकशी करीत होते. मात्र कुटुंबातील सदस्य आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगून टाळाटाळ करीत होते. खानबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. पण पोलिसांनी त्याचा मोबाइल क्रमांक प्राप्त केला. त्याचा सीडीआर प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच आरोपी २९ जून रोजी राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पावर, पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, हवालदार सुरेश कडलग, हवालदार अशोक लादे, पोलीस शिपाई. मधूकर मंडलिक यांच्या पथकाने आरोपीच्या राहत्या घराबाहेर सापळा रचला. आरोपी बेसावध असताना पोलीस पथकाने त्याला घेरले व त्याला अटक केली. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती खान असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. आरोपीविरोधात जमाव जमवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon