अनैतिक संबंधातून विधवा महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या; अवघ्या तासभरात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

अनैतिक संबंधातून विधवा महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या; अवघ्या तासभरात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

जळगाव – शहापूर तालुक्यातील जामनेर येथे एका तरुणाने विधवा महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केला. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. तेव्हा महिलेने तरुणाच्या हातावर गरम पाणी टाकले होते. याचाच राग तरुणाच्या मनात होता आणि त्याने संधी साधून महिलेचा जीव घेतला. संगीता पिराजी शिंदे (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर किरण कोळी (२६) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला तासभरातच तळेगाव येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत संगीता हिच्या पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. तिला मुलगा आणि मुलगी आहे. तीन दिवसांपूर्वी संशयित आरोपी महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी दोघांमध्ये भांडण झाले आणि तिने किरणच्या हातावर गरम पाणी टाकले त्यामुळे त्याचा हात भाजला होता. सोमवारी सकाळी संगीताने किरणला शिवीगाळ केली, त्याला राग अनावर झाला. त्याने समोरच असलेला दगड उचलून तिच्या डोक्यात घातला, त्यात तिचा मृत्यू झाला. मयत व संशयित यांच्यातील अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा संशय आहे. विधवा महिलेचा फोन घेऊन संशयित हा तळेगावकडे पसार झाला. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे व उपनिरीक्षक दीपक रोटे हे शहापूर येथे पोहोचले. शिंदे यांनी संशयिताचा ठाव ठिकाणा शोधून त्याच्या मुस्का आवळल्या. संशयिताच्या उजव्या हातावर भाजल्याची जखम पाहून डीवायएसपी येरवडे यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने महिलेने तीन दिवसांपूर्वी हातावर गरम पाणी फेकल्याचे सांगितले.

मयत महिला संगीता शिंदे ही शेतात मजुरी करून मुलांचे पालन पोषण करीत होती. तिला बारा वर्षाची मुलगी व आठ वर्षाचा मुलगा आहे. गावातच तिचे दोन भाऊ राहतात. घटना घडली तेव्हा मृत महिलेची मुलगी शेतात कामासाठी गेली होती तर मुलगा बाहेर खेळायला गेला होता. या महिलेची मुलगी व मुलगा सध्या त्यांचे मामा धनराज शंकर वडार यांच्याकडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वडार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारपासून लागू झालेला भारतीय न्याय संहितेतील कलम १०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon