कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, चालकाला बेदम मारहाण
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताची घटना ताजी असताना कल्याणमध्ये त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. कल्याण परिसरात एका अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिली व आपल्या मित्रांना बोलावून कारचालकाला बेदम मारहाण करत, गाडीची तोडफोड देखील केली आहे. सदर मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून अल्पवयीन मुलाचे वडील हे भाजपचे पदाधिकारी असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास पोलीस सुरवातीला विलंब करीत होते. यानंतर कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण अटाळी गावात शुक्रवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलगा ब्रिझा कार घेऊन कल्याणवरून अटाळी येथे असलेल्या आपल्या घरी जात होता. अटाळी चौकात रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या किया कारला अल्पवयीन मुलाने धडक दिली. या धडकेनंतर वाद निर्माण झाला.
या वादात मुलाने कारचालकाला बेदम मारहाण करत गाडीची तोडफोड केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने फोनव्दारे संपर्क करून काही गुंड मित्र बोलवून घेतले आणि किया कारमध्ये असलेल्या वाहन चालकाला बेदम मारहाण केली.
एवढी गंभीर घटना घडून सुद्धा कल्याण खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तक्रारदार नसल्यामुळे गुन्हा दाखल केला नाही, असे सांगण्यात आले. या अपघाताची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवर स्वतः स्युमोटो दाखल करून तपास सुरू केला आहे. या अल्पवयीन मुलाचे वडील राजाराम चौधरी हे भाजपचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. राजाराम चौधरी यांनी पोलिसांवर राजकीय दबाब टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारदार नसल्याचे कारण देत गुन्हा दाखलच केला नाही. मात्र सोशल मीडियावर अपघाताची चर्चा रंगल्यावर पोलिस स्वतः तक्रारदार झाले आणि स्युमोटो दाखल केला.