डोंबिवलीत ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्तीला टिळक नगर पोलिसांकडून रक्कम परत
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – राज्यात ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, असं असलं तरी डोंबिवलीच्या टिळक नगर पोलिसांनी फसवणूक झालेल्या व्यक्तीला पुन्हा रक्कम मिळवून देत वाहवा मिळवली आहे. डोंबिवलीमधील एका इसमाला शेअरमार्केटमध्ये अधिकचा परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झालेल्या एकूण २७,८५,५००/- रुपयांपैकी ९,८५,००८/- रुपये संबंधित व्यक्तीला परत मिळवून देण्यात टिळक नगर पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाच्या आदेशाने ती रक्कम तक्रारदाराला परत देण्यात आली.
शेअरमार्केटमध्ये अधिकचा परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने एकूण २७,८५,५००/- रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार टिळक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी ४१८/२०२४ माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम-६६ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करून याबाबत ताबडतोब नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार रजिस्टर केली.त्यामुळे फिर्यादी यांची तक्रार रजिस्टर केल्यामुळे एकूण २७,८५,५००/- रुपये फसवणूक रक्कमे पैकी एकूण ९,८५,००८/- रक्कम थांबविण्यात आली. दरम्यान, एकूण ९,८५,००८/- रुपये रक्कम न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी यांना परत करण्यात आली. सदरची यशस्वी कामगिरी टिळक नगर पोलीस ठाण्याचे वपोनिरी. विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग पिठे सहा. पोलीस निरिक्षक, पो.शि. प्रकाश मुंडे, पो शि अजितसिंह राजपुत, पो ना विनोद बच्छाव यांनी केली आहे.