क्रूर माता ! आईने प्रियकराच्या मदतीनं पोटच्या २ लेकरांच्या घोटला गळा, दोन महिन्यानंतर घटना समोर

Spread the love

क्रूर माता ! आईने प्रियकराच्या मदतीनं पोटच्या २ लेकरांच्या घोटला गळा, दोन महिन्यानंतर घटना समोर

योगेश पांडे / वार्ताहर 

अहमदनगर – हत्येचं एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका आईनेच आपल्या मुलांचा जीव घेतला. दोन महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एप्रिल महिन्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (१२) आणि प्रणव सारंगधर पावसे (८) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. वर्षभराआधी या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती. मुलांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलीस काहीही कारवाई करत नसल्याने काही दिवसांपूर्वी पुणे महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यानंतर पोलीसांनी सखोल तपास केला. यावेळी मुलांची आई कविता सारंगधर पावसे हिने तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे याच्या मदतीने हे सगळं केल्याचं समोर आलं. आईनेच प्रेमात अडसर ठरणा-या आपल्या मुलांना शेततळ्यात बुडवून मारल्याचं वास्तव समोर आलं आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना गजाआड केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon