ऑनलाईन क्रिकेट जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाकडून वृद्ध महिलेचा खून, आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी केली अटक

Spread the love

ऑनलाईन क्रिकेट जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाकडून वृद्ध महिलेचा खून, आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या तरुणाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली. कर्ज फेडण्याकरिता त्याने ही हत्या करून त्यांचे दागिने चोरी केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. आशा अरविंद रायकर (६२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून त्या डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर भागातील वसंत निवास इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होत्या. यश सतीश विचारे (२८) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आशा यांची विरार येथे राहणारी नातेवाईक दीपा दिगंबर मोरे (४५) यांनी या खून प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आशा रायकर राहत असलेल्या वसंत निवास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या खूनाचा उलगडा करणे पोलिसांंसमोर आव्हान होते.

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी या वृद्धेच्या खून प्रकरणी तपास पथके तयार करून खुनाचा तपास तातडीने सुरू केला होता. पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी सांंगितले, आशा रायकर घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ, कर्णफुले होती. खून केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज गायब होता. चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, साहाय्यक निरीक्षक सचीन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर यांच्या पथकाने वसंत निवासमध्ये राहणाऱ्या यश सतीश विचारे या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू केली. यात त्याने खुनाची कबुली दिली. तसेच क्रिकेट ऑनलाईन जुगारात ६० हजार रुपयांचे कर्ज झाले होते. कर्ज देणाऱ्यांनी पैशांचा तगादा लावला होता. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी आशा रायकर यांची हत्या करून त्यांच्या अंंगावरील दागिने चोरल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आशा रायकर घरात एकट्याच असताना यश विचारे हा त्यांच्या घरात शिरला. त्याने आतून दरवाजाची कडी लावून आशा रायकर यांना काही कळण्याच्या आत त्यांचा खून केला. त्यांच्या गळ्यातील, कानातील सोन्याचा ऐवज काढून घेऊन, दरवाजाला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. रात्री उशीर झाला तरी आशा यांच्या घराला बाहेरून कडी असल्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली. त्यांचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी त्यांचा मृतदेह घरात आढळून आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon