गुजरातमधून महाराष्ट्रात येणारा अवैध मद्यसाठा जप्त ; वाहक व चालक अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक, वाहकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात ही कारवाई केली. या कारवाईत एक लाख १४ हजार रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी बसचालक विजय बलसार (५२) व वाहक अमृत पटेल (५६, दोघे रा. सुरत) यांच्यासह पंचवटीतील मद्यविक्री करणाऱ्या चालक, मालकाविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी जिल्हयाचे सीमावर्ती भागांमधील चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहेत. याठिकाणी सोमवारी गुजरात राज्य परिवहन महामंडळ नाशिक सुरत बस क्र. जीजे -१८-झेड -८९७० या बसमधून मद्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकराजु सुर्वे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचून गुजरात राज्यात जात असलेली वरील बस थांबवत तपासणी केली असता, त्यामध्ये रूपये १ लाख १४ हजार ६३५ रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा विनापरवाना अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व दिंडोरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.