ससून रुग्णालयातून आरोपी पलायनप्रकरणी दोन पोलीस निलंबित
शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा मार्शल लिलाकर ससूनमधून झाला होता पसार
पुणे – कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना समाजमाध्यमातून अश्लील कमेंट करून धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी ससून रुग्णालयामधून पसार झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस शिपाई निखिल अरविंद पासलकर आणि पोपट काळूसिंग खाडे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्शल लुईस लिलाकर (रा. आकुर्डी) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. ससूनमधून तो पळून गेल्याची घटना सोमवारी (दि. ११) घडली होती.त्या अगोदर रविवारी पहाटे छातीत दुखत असल्याचे सांगितले असता त्याला सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई पासलकर आणि खाडे घेऊन ससून रुग्णालयात गेले.
बाह्य रूग्ण उपचार कक्षात मार्शलची तपासणी सुरू असताना तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. मार्शल पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत पोलिस कर्मचारी खाडे आणि पासलकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्याने दोघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.