पुण्यातील अट्टल बुलेट चोराचे बीडमध्ये कारनामे ; पोलिसांकडून ७ दुचाकी जप्त
बीड – पुणे जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यात दुचाकी चोरून बीडला आणून विक्री करणाऱ्या अट्टल बुलेट चोराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ७ दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. सूरज शंकर गायकवाड (वय २५ रा. संत तुकारामनगर, पिंपरी चिंचवड) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सूरज गायकवाड हा बुधवारी बीडमध्ये विक्री केलेल्या दुचाकीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे हवालदार अशोक दुबाले यांना मिळाली. त्यांनी पाेलिस निरीक्षक संतोष साबळे यांना माहिती देऊन आपल्या पथकासह सापळा लावला.
पैस घेण्यासाठी येताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरणे व फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली.