सोलापूर हादरलं ! क्षुल्लक कारणावरून बापाने घेतला मुलाचा जीव ; निर्दयी बापाला अटक
सोलापूर : सोलापूरमधून वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वडिलांकडे मोबाईल मागितल्याने निर्दयी बापाने आपल्या पोटच्या लेकराचा जीव घेतला आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. विजय सिद्राम बट्टू असा आरोपी-वडिलांचे नाव आहे तर विशाल बट्टू (वय वर्ष १४) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.
काय संपूर्ण प्रकरण…
सोलापूर तुळजापूर हायवे वरील सर्विस रोड लगतच्या नाल्याजवळ १३ जानेवारी रोजी पोलिसांना एका १४ वर्षे मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे गुढ उकलण्यात अखेर सोलापूर पोलिसांना यश आले आहे. बापानेच आपल्या मुलाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
या कारणामुळे केला खून?
मुलाच्या शाळेतून येणाऱ्या सततच्या तक्रारी अभ्यास न करणे, घरात शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल पाहणे, मोबाईल मागणे याचा राग अनावर झाल्याने आरोपी विजय सिद्राम बट्टू आपल्या मुलाची हत्या केली. त्याने शीतपेयात विषारी पावडर टाकून आपल्या मुलाचा जीव घेतला. याप्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बापाला अटक केली केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे