शिंदे गटाला धक्का ! शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील अजित पवारांच्या गटात सामील

Spread the love

शिंदे गटाला धक्का ! शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील अजित पवारांच्या गटात सामील

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंविरोधात उमेदवारी देण्याची अजित पवार गटाची तयारी

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – राज्यात आता लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु व्हायला लागल्या आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं नुकतेच अजित पवारांनी सांगितलं. यावर कोल्हे-पवार यांच्या क्रिया-प्रतिक्रिया सुरु असतानाच आता शिरुरचे माजी खासदार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील हे अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

माध्यमांतील चर्चांनुसार, अजित पवारांनी शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्यानंतर अजितदादांचा उमेदवार कोण असेल? अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता आढळराव पाटीलच ते उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यामुळं गेल्यावेळची सगळी राजकीय समिकरणंच बदलुन गेली आहेत. कारण सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती. त्यामुळं शिरुर लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सेनेनं पुन्हा उमेदवारी दिली होती. तर आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत कोल्हेंचा विजय झाला होता. पण त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यामुळं आपल्याला निवडणुकीत पाडणाऱ्यांसोबत सत्ता स्थापन केल्यानं आढळराव पाटील उद्धव ठाकरेंवर नाराज होते. पण पुढे एकनाथ शिंदेंमुळं शिवसेनेत फूट पडल्यानं आढळरावांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत गेले. दरम्यान, राष्ट्रवादीतही अजित पवारांमुळं फूट पडली त्यामुळं आता शरद पवारांसोबत असलेल्या अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांनी दंड थोपटले आहेत.

या राजकीय परिस्थिचा फायदा घेण्यासाठी आता आढळराव पाटील शिंदे गटातून अजित पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. कारण अजित पवार जर शिरुर मतदारसंघात कोल्हेंविरोधात उमेदवार शोधत असतील तर तो उमेदवार आपण होऊ शकतो अशी आशा आढळराव पाटलांना असावी. त्यामुळं आता पुन्हा शिरुर मतदारसंघात आढळराव विरुद्ध कोल्हे असा एकाच पक्षातील दोन गटांचा सामना पाहायला मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon