दौंडमध्ये घरफोड्यांचा पर्दाफाश; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक, १० गुन्ह्यांची उकल

Spread the love

दौंडमध्ये घरफोड्यांचा पर्दाफाश; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक, १० गुन्ह्यांची उकल

पोलीस महानगर नेटवर्क

दौंड : तालुक्यातील वाखारी परिसरात सातत्याने घडत असलेल्या घरफोडीच्या घटनांचा यवत पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून छडा लावत सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. या टोळीने एकूण १० घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे वाखारी येथे एका घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९८ हजार ६७१ रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्याचवेळी परिसरातील आणखी एका घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले. या घटनांनंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील रुकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंडेगाव येथील महेश संभाजी भोसले तसेच न्हावरा येथील अमोल शास्त्री भोसले यांना अटक केली.

या टोळीने यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा आणि उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अशा एकूण १० घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरीचा ऐवज त्यांनी अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिक किरण विलास बुऱ्हाडे याला विकल्याचे उघड झाल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्य आरोपी रुकुल चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडी, लूटमार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. काही काळापासून फरार असलेल्या या आरोपीला अटक करण्यात यवत पोलिसांना यश मिळाले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon