रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुक वर बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या तिघांना अटक
पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुकवर अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत रूपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. चाकणकर यांच्याबाबत अश्लील मजकूर लिहिलेली पोस्ट विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे आणि अमोल के. पाटील यांनी फेसबुकवर प्रसारित केली होती. त्यांच्याविरुद्ध पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्या संशयितांचे मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांनी प्राप्त केले. त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, जि. सांगली) या संशयिताचा शोध घेतला.
पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी त्याला सांगलीतून ताब्यात घेतले. तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस बजावून मोबाईल जप्त केला आहे. अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्या अन्य एका संशयिताची फेसबुक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेण्यात आली. त्यानुसार वसंत रमेशराव खुळे (वय ३४, रा. रहाटी, ता.जि. परभणी) या संशयिताला २६ नोव्हेंबर रोजी रहाटीतून ताब्यात घेतले. तसेच प्रदीप कणसे या संशयितालाही ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे. हि कारवाई आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक स्नेहल आडसुळे, पोलिस उपनिरीक्षक विद्या साबळे, पोलिस अंमलदार संतोष जाधव, दिनेश मरकड, श्रीकृष्ण नागटिळक, उमा पालवे, सुनील सोनोने यांच्या पथकाने यांनी केली.