तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज; तपास यंत्रणांची भीती दाखवत महिलेची दोन कोटींची फसवणूक

Spread the love

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज; तपास यंत्रणांची भीती दाखवत महिलेची दोन कोटींची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे- राज्यात सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, ट्रेडिंग व शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकांची मोठया प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. पोलीस नेहमीच अशा सायबर भामट्यापासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना वेळोवेळी करीत असतात, परंतु नागरिक आमिषाला बळी पडून आयुष्याची पुंजी वाया घालवतात अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. तुमच्या नावाने मुंबई येथून पाठवलेले पार्सल कस्टममध्ये अडकले आहे. त्याचे संबंध दहशतवादाशी आहेत, असे सांगून एका जेष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २६ एप्रिल रोजी ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधला. फेडेक्स कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून आकाशकुमार बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली. मुंबई विमानतळावर फेडेक्स कुरिअर कंपनीकडून पाठविण्यात आलेले पाकिट सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त करण्यात आले आहे. पाकिटमध्ये अमली पदार्थ सापडले असून, याप्रकरणी मुंबईतील अमली पदार्थ विभागात (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई टाळायची असेल तर एक ॲप डाऊनलोड करा, असे चोरट्याने सांगितले. बँक खात्याची माहिती चोरट्याने घेतली. बँक खात्याची माहिती पडताळण्यासाठी तुमच्या खात्यातील सर्व पैसे माझ्या खात्यात पाठवा, अशी बतावणी चोरट्याने केली.

चोरट्याच्या सांगण्यावरुन महिलेने चोरट्याच्या खात्यात दोन कोटी ८० हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon