चिकन शॉरमा खाल्ल्याने १० ते १२ जणांना अन्नातून विषबाधा,१९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Spread the love

चिकन शॉरमा खाल्ल्याने १० ते १२ जणांना अन्नातून विषबाधा,१९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मानखुर्दमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील महाराष्ट्र नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी २ दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूला तयार केलेला शॉरमा खाल्ला होता. यामुळे स्थानिकांपैकी १० ते १२ जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यापैकीच एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश भोकसे असं मरण पावलेल्या तरुणाचं नावं असून तो १९ वर्षांचा होता. या तरुणाच्या मृत्यूच्या वृत्ताला ट्रॉम्बे पोलिसांनी दुजोरा दिला असून सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. मानखुर्दमध्ये बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्र नगरमध्ये तर अशाप्रकारे अगदी अन्नपदार्थांची खुलेआम रस्त्याच्या बाजूला विक्री करणारे अनेक छोटे स्टॉल रोज लागतात. रस्त्याच्या बाजूलाच स्वच्छतेसंदर्भातील कोणतेही नियम न पाळता अन्नपदार्थ तयार करुन विकले जातात. कमी पैशांमध्ये हे पदार्थ उपलब्ध असल्याने अनेकजण या दुकानांसमोर अगदी ताटकाळत उभं राहून पदार्थंचे सेवन करतात. मात्र अशाप्रकारे उघड्यावर तयार केलेला शॉरमा खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

महाराष्ट्र नगरमधील एका छोट्या स्टॉलवर शॉरमा खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने १० ते १२ ग्राहकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. चिकन शॉरमामधून विषबाधा झाल्यानंतर या सर्वांना त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केलं. काहीजणांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी ज्यांची प्रकृती स्थिर होती आणि त्यांना फारसा त्रास नंतर जाणवला नाही त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, महाराष्ट्र नगरमध्ये राहाणाऱ्या प्रथमेश भोकसेची प्रकृती चिंताजनक होती. त्याला दुसऱ्या दिवशीही त्रास होत होता. त्यामुळेच त्याला थेट केईएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. या रुग्णालयात उपचार सुरु असतानाही प्रथमेशची प्रकृती खालावत गेली आणि मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून याबाबत गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली आहे. पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे शॉरमासाठीचं मांस कुठून आणलं होतं, बाकी पदार्थ कुठे बनवले जायचे यासंदर्भातील तपास करत आहेत. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा अंश अधिक असलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ बराच काळ बाहेर ठेवून खाल्ल्यास त्यामधून विषबाधा होण्याची शक्यता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon