ईव्हीएम हॅक करण्यासाठी हॅकरने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी; आरोपीला पुण्यातून केले जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ईव्हीएम हॅक करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.
ढाकणे याने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे एव्हीएम आहेत, ते सर्व हॅक करतो, आणि तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन अंबादास दानवेंना फोनवरून दिले. या कामासाठी त्याने अडीच कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने दानवे यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
या प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, मारोती ढाकणे, असे आरोपीचे नाव आहे. तो नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातला रहिवासी आहे. ढाकणे सैन्य दलामध्ये जवान असून जम्मू काश्मिरमध्ये सेवेत आहे. त्याचे शिक्षण बीए पदवीपर्यंतचे झाले. त्याच्यावर मोठे कर्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते कर्ज फेडण्याच्या भामटेगिरीतून ढाकणे याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधून ईव्हिएम हॅक करून देतो असे सांगितले. त्यासाठी त्याने दानवे यांच्याकडे अडीच कोटींची मागणी केली. दानवे यांना संशय आल्याने त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेची संपर्क साधला. दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. दरम्यान, मंगळवारी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने मारोती नावा ढाकणे याला मध्यवर्ती बस स्थानकासमोरील भागातल्या एका हाॅटेलमध्ये एक लाख रुपये घेताना पकडले. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक होण्याचा मुद्दा समोर आला आहे.