शिवसेनेच्या ‘धनुष्या’वर काँग्रेसचा ‘बाण’ एसटी बसवर जाहिरातबाजी, आचारसंहितेचा भंग; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Spread the love

शिवसेनेच्या ‘धनुष्या’वर काँग्रेसचा ‘बाण’ एसटी बसवर जाहिरातबाजी, आचारसंहितेचा भंग; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर बॅनर लावून बेकायदा शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहित ही मागणी केली आहे. त्याचवेळी महायुतीकडून आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केला असल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.

निवडणूक प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांच्या मालमत्तांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र सर्व राज्यांचे कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून पाठवलेले आहे. बंदी असतानाही एसटीच्या अधिकाऱ्यांनी १००० हून अधिक बस शिवसेना उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी अवैधपणे वापरास परवानगी दिली आहे. एसटी महामंडळाच्या या बसेसवर शिवसेना बॅनर लावून निवडणूक प्रचार करत आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह स्पष्टपणे दाखवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे हे कृत्य केवळ आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन करत नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेला बाधा आणणारे आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon