रेल्वेमधून दारूची गुजरातमध्ये तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना बेड्या; बोरिवली पोलीसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Spread the love

रेल्वेमधून दारूची गुजरातमध्ये तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना बेड्या; बोरिवली पोलीसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. अशाच प्रकारे मुंबईच्या बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंतरराज्यीय टोळीकडून गुजरात, भरूच येथे विविध ब्रँडची दारू पाठवली जात असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोरीवली एस. वी. रोड येथे सापळा रचून ४ दारू तस्करांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मद्याच्या बॉटल देखील हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली एस, व्ही. रोड परिसरातील काही वाईन शॉपमधून ब्रँडेड कंपन्यांची दारू मोठ्या प्रमाणावर गुजरात भरुच येथे पाठविली जाणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. यासाठी चार तरुण गुजरात येथून मुंबई बोरिवली येथे येऊन ते रेल्वेने अवैधरित्या ब्रँडेड कंपन्यांची दारू घेऊन जाणार होते. मागील अनेक दिवसांपासून ही आंतरराज्य टोळी बोरिवली येथून गुजरातला दारू घेऊन जात असल्याचे समजल्याने पोलीस देखील या टोळीवर लक्ष ठेवून होते.

गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीची खात्री करून बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लाड, पोउनि प्रमोद निंबाळकर व एटीसी पथकाने ११ मे रोजी छापा टाकला.या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपी गुलामभाई भवसंगबाई राज – ४६, साबीर शरीफ शेख – ३१ या दोघांना पाच दारुच्या भरलेल्या बॅगांसहित पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे आणखी दोन साथीदार बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ येथे उभे असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर जाऊन पिंटू विजय गुप्ता – २८ व दिनेश प्रेमनारायण शुक्ला – ५० या दोघांना ताब्यात घेऊन यांच्याकडून आणखी सहा मद्यायाच्या बाटल्याने भरलेल्या बॅगा जप्त केल्या. या चारही दारू तस्करांकडून विविध कंपनीच्या एकूण ६३४ दारुच्या बाटल्या जप्त केल्या. ज्यांची बाजारभावातील किंमत सुमारे १ लाख ११ हजार ४०० इतकी आहे. पोलिसांनी या चारही जणांविरोधात विनापरवाना व बेकायदेशीररित्या दारु बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon