वाहनाचे नुकसान केलं म्हणून १० वर्षीय मुलाला झाडाला बांधून मारहाण; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

वाहनाचे नुकसान केलं म्हणून १० वर्षीय मुलाला झाडाला बांधून मारहाण; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी येथील टेमघर पाडा भागात वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप करत एका १० वर्षीय मुलाला घरातून बाहेर आणून त्याला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेमघर पाडा भागात १० वर्षीय मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याची आई मजूरी करते. गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारी महिला त्यांच्या घरी आली. तिच्या हातामध्ये लाकडी दांडका होता. त्या महिलेने मुलाला शिवीगाळ आणि मारहाण करत त्याला घराबाहेर आणले. त्यानंतर महिला आणि तिच्या मुलाने त्या मुलाला परिसरातील एका पेरूच्या झाडाला बांधून ठेवले. तसेच वाहनाचे नुकसान का केले याबाबत जाब विचारण्यास सुरूवात केली. मुलाने असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगितले असतानाही त्याला मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पथक त्याठिकाणी गेले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात महिला आणि तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon