उल्हासनगर जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह; ऑपरेशनसाठी चारदा उपाशी ठेवल्याचा रुग्णाचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित अनागोंदी कारभाराचा प्रकार समोर आला असून, एका रुग्णाला शस्त्रक्रियेच्या नावाखाली चार वेळा उपाशी ठेवून अखेरच्या क्षणी ऑपरेशन पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
राजकुमार पासी हे गेल्या महिनाभरापासून उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगून वारंवार तयारी करण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी ऑपरेशन रद्द करण्यात आल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. कधी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे, तर कधी आवश्यक प्रक्रिया अपूर्ण असल्याचे कारण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे मानले जाते. अशा परिस्थितीत एका रुग्णाला वारंवार उपाशी ठेवून शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांचे रुग्णालय प्रशासनाने खंडन केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी सांगितले की, संबंधित रुग्णाचे ऑपरेशन महात्मा गांधी फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत होणार होते. मात्र कागदपत्रांतील त्रुटी, उशिरा झालेली नोंदणी आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण न झाल्यामुळे प्रक्रियेला विलंब झाला.
ऑपरेशनपूर्वी रुग्णाची फिटनेस चाचणी, रक्त तपासण्या आणि इतर वैद्यकीय अहवाल आवश्यक असतात. सर्व अहवाल समाधानकारक आल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाते. तसेच आधीपासून दाखल असलेल्या गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रियांना प्राधान्य द्यावे लागत असल्याने काही वेळा विलंब होतो, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
तथापि, “चार वेळा दिवसभर उपाशी ठेवून अखेर ऑपरेशन पुढे ढकलणे हा कोणता वैद्यकीय प्रोटोकॉल आहे?” असा सवाल रुग्णाच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेबाबत या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.