बविआ शिवसेनेत विलीन होणार?; हितेंद्र ठाकूरांच्या ठाणे दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असतानाच बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होण्याच्या चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना पक्ष विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचदरम्यान हितेंद्र ठाकूर यांचा ठाणे दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी शिवसेना मोठी रणनीती आखत आहे. वसई-विरारमध्ये प्रभाव असलेल्या बहुजन विकास आघाडीला थेट शिवसेनेत सामावून घेण्याचा प्रस्ताव शिंदेंकडून ठाकूर पिता-पुत्रांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संभाव्य राजकीय निर्णयाचा फटका शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांना बसू शकतो, अशी चर्चा आहे. त्यांच्या जागी हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना ठाणे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, हितेंद्र ठाकूर हे अचानक खासगी वाहनाने ठाण्याकडे रवाना झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तर्कवितर्कांना आणखी उधाण आले आहे. अधिकृतरीत्या हा वैयक्तिक दौरा असल्याचे सांगितले जात असले तरी, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकूर कोणत्या नेत्यांची भेट घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी रवींद्र फाटक इच्छुक असल्याचे सांगितले जाते. त्यांनी अलीकडेच वसईत जाऊन हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याने या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या भेटीनंतर बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा शिवसेनेला मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.
वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असून पक्षाकडे तब्बल ७१ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील हे संख्याबळ अत्यंत निर्णायक मानले जाते. त्यामुळे बविआचा पाठिंबा मिळाल्यास शिवसेनेच्या उमेदवाराला थेट फायदा होऊ शकतो.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेने महायुतीकडे सहा जागांची मागणी केली होती. आतापर्यंतच्या चर्चेनुसार ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी या जागा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. आता ठाण्याच्या जागेसाठी एकनाथ शिंदे कोणता अंतिम निर्णय घेतात आणि क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.