कल्याण रेल्वे स्टेशन मारहाण प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहाजणांची निर्दोष मुक्तता

कल्याण रेल्वे स्टेशन मारहाण प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहाजणांची निर्दोष मुक्तता

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : २००८ मधील कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा आरोपींची ठाणे न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. ठाणे जिल्हा मुख्य न्यायिक दंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. पुराव्याअभावी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींना दिलासा दिला.

रेल्वे भरती परीक्षा २००८ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्याबाहेरून मोठ्या संख्येने उमेदवार कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आले होते. त्यावेळी काही उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. रेल्वे भरती प्रक्रियेत बिहारी तरुणांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही मनसेकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपींचा गेल्या काही वर्षांत मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित सहा आरोपींविरोधात सुनावणी सुरू होती. सुरुवातीला हे प्रकरण कल्याण न्यायालयात सुरू होते. नंतर ते ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले.

६ मे रोजी झालेल्या सुनावणीत राज ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता.

बचाव पक्षाकडून अ‍ॅड. शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सह्याजी शिंदे यांनी बाजू मांडली. तर सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला. गुरुवारी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत प्रकरण निकाली काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon