सातबाऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी ३० हजारांची लाच; पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
पनवेल : सातबाऱ्यावर नाव नोंदवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गोवर्धन नाना माने (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीने मौजे पनवेल गावदेवी पाडा येथील सर्व्हे क्रमांक ७४ अ, प्रॉपर्टी क्रमांक १३३०/१ मधील ४.२२ गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नोंदवून देण्यासाठी गोवर्धन माने यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १६ मे रोजी रायगड एसीबीकडे करण्यात आली होती.
त्यानंतर १८ आणि १९ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत माने यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये स्वतःसाठी २० हजार रुपये आणि ‘थम अप्रूव्ह’ करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी १० हजार रुपये अशी मागणी करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
यानुसार मंगळवारी सायंकाळी एसीबीने सापळा रचला. पनवेलमधील शिवशंभो नाका परिसरात पंचमुखी हनुमान मंदिराजवळील मिठास स्वीटसमोर माने यांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात विनोद जाधव, महेश पाटील आणि नवदित नांदगांवकर यांचा समावेश होता. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक शिवराज पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती अथवा लाच मागितल्याची तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.