वांद्र्यातील गरीब नगर झोपडपट्टीवर बुलडोझर; पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर सौम्य लाठीचार्ज
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालवला जात असताना गोंधळ झाल्याचं दिसून आलं. या कारवाईला विरोध करणाऱ्या काही जणांकडून पोलिसांवर बाटल्या फेकण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या ठिकाणची गर्दी पाहता पोलिसांनी आता अधिकची कुमक मागवली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे.
मुंबईतल्या वांद्रे भागात रेल्वेच्या हद्दीतील आत्तापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. आरपीएफ आणि जीआरपी एकत्रितपणे ही कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरनं वांद्र्याच्या रेल्वेलाईनच्या आजूबाजूच्या झोपडपट्टी अतिक्रमणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. एबीपी माझानंही ही बातमी लावून धरली. अखेर खडबडून जागी झालेल्या रेल्वेनं अखेर अतिक्रमणविरोधी कारवाईचं हत्यार उपसलं आहे.
वांद्र्यातील रेल्वेच्या हद्दीत तब्बल ५ हजार स्क्वेअर मीटरवरचं अतिक्रमण आहे. काही दिवसांपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई झाली. मात्र अतिक्रमण केलेल्यांनी हायकोर्टात धाव घेतली. राजकीय पाठबळामुळे या कारवाईत खोडा घातला गेला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वांद्र्यातील अतिक्रमण करण्यात आलेल्या गरीब नगर झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेने कारवाई सुरू केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू असून स्थानिकांनी त्याला विरोध केल्याचं दिसून आलं. त्यावेळी काही नागरिकांनी पोलिसांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत या ठिकाणी जमलेली गर्दी हटवली. दरम्यान, या ठिकाणी जमलेली लोकांची गर्दी पाहता पोलिसानी अतिरिक्त बळ मागवलं आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचे दंगल विरोधी पथकही दाखल झाले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवण्याची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.