ठाणे महापालिकेचा परिमंडळ लोकशाही दिन १५ जूनला; १ जूनपर्यंत निवेदन सादर करण्याचे आवाहन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी ठाणे महानगरपालिका तर्फे १५ जून रोजी परिमंडळ स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदने १ जून २०२६ पर्यंत संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
महापालिकेकडून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर परिमंडळ लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्यानुसार, यावेळी १५ जून रोजी नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी आणि समस्या ऐकून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
परिमंडळ १ अंतर्गत कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील नागरिकांनी कळवा प्रभाग समिती कार्यालयात, परिमंडळ २ मधील नौपाडा आणि वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांनी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात, तर परिमंडळ ३ अंतर्गत उथळसर, वर्तकनगर, लोकमान्य सावरकरनगर आणि माजिवडा-मानपाडा परिसरातील नागरिकांनी माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती कार्यालयात निवेदने सादर करावीत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
परिमंडळ लोकशाही दिनात तक्रारींचे निराकरण न झाल्यास नागरिकांना नियमानुसार महापालिका लोकशाही दिनासाठी १५ दिवस आधी निवेदन सादर करता येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.