बांद्रा येथील पुनर्विकास प्रकल्पात कथित १२ कोटींचा अपहार; हिस्सेदाराविरोधात गुन्हा दाखल
रवि निषाद / मुंबई
मुंबई : बांद्रा पूर्व येथील पुनर्विकास प्रकल्पातील १९ फ्लॅट परस्पर विक्री करून जवळपास १२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी निर्मळ नगर पोलिसांनी एका हिस्सेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे बांधकाम आणि पुनर्विकास क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासक वसंतराज मेघराज शेठीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून वामन रामचंद्र माडए यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेठीया हे “शेठीया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.” या कंपनीमार्फत बांद्रा पूर्व येथील निर्मळ नगरमधील गौसिया कंपाऊंड परिसरात इमारत बांधकाम प्रकल्प राबवत होते. या प्रकल्पात वामन माडए हे हिस्सेदार म्हणून सहभागी होते.
तक्रारीनुसार, प्रकल्पातील १९ फ्लॅटची परस्पर विक्री करून वामन माडए यांनी ११ कोटी ५१ लाख ७३ हजार ८५० रुपये स्वतःच्या ताब्यात घेतले. तसेच संबंधित व्यवहारांचा हिशेब देण्यास त्यांनी नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी वसंतराज शेठीया यांनी त्यांचे वकील समाधान सुळाने यांच्या माध्यमातून विविध संबंधित विभागांकडे तक्रार केली होती. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडेही याबाबत निवेदन देण्यात आले होते. प्राथमिक तपासानंतर निर्मळ नगर पोलिसांनी १५ मे २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ४१५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या संदर्भात बोलताना अॅड. समाधान सुळाने यांनी, “तक्रारदाराचे पैसे परत मिळेपर्यंत कायदेशीर लढा सुरू राहील. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपीला लवकरच अटक होईल,” असा दावा केला.
दरम्यान, या प्रकरणामुळे पुनर्विकास प्रकल्पांतील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिसांकडून आर्थिक कागदपत्रांची छाननी सुरू आहे.