डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांचा दणका; सात जणांवर फौजदारी गुन्हे
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : रेल्वे स्थानक परिसरासह शहरातील विविध भागांत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभ्या करणाऱ्या सात रिक्षाचालकांविरोधात रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार, परिसरात सुमारे ५६ हजार नोंदणीकृत रिक्षा असून त्यापैकी जवळपास ३० हजार रिक्षा कल्याण-डोंबिवली शहरात प्रवासी सेवा देतात. रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी निश्चित वाहनतळांवरच रिक्षा उभ्या करण्याच्या सूचना वाहतूक पोलीस व परिवहन विभागाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र, अनेक रिक्षाचालकांकडून या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रस्ते, चौक आणि गल्ल्यांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे.
काही ठिकाणी नागरिकांनी किंवा वाहनचालकांनी रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केल्यास वाद, शिवीगाळ तसेच मारहाणीच्या घटनाही घडत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.
उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवली परिसरातील २०० हून अधिक रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक शिस्तीसाठी सुरू असलेल्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.