ठाणे पोलिसांचा ‘तक्रार निवारण दिन’; दोन दिवसांत ७५० अर्जांची जागेवरच सोडवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नागरिकांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने ‘१०० दिवसांच्या कृती आराखड्या’ अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. ९ आणि १० मे रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात एकूण ९५६ अर्जदारांना उपस्थित राहण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ७९२ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. तक्रार निवारण प्रक्रियेत पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी तब्बल ७५० अर्जांची जागेवरच अर्जदारांच्या समक्ष निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जदारांनाही पुढील टप्प्यात बोलावून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या समस्या ऐकून तत्काळ कार्यवाही केल्याने अर्जदारांनी समाधान व्यक्त केले. तसेच ठाणे शहर पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
ही माहिती जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.