दातिवरे खाडीत अवैध वाळू उपशावर संयुक्त कारवाई; रेतीने भरलेली बोट जाळली
पालघर / नवीन पाटील
महाराष्ट्र शासनाने अवैध रेती व वाळू उपसावर कडक निर्बंध लागू केले असतानाही केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील दातिवरे खाडीत सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर शनिवारी संयुक्त कारवाई करण्यात आली. केळवा सागरी पोलीस ठाणे आणि पालघर महसूल विभागाने ही धडक कारवाई करत रेतीने भरलेली लाकडी बोट जाळून टाकली, तर सेक्शन पंप गॅस कटरच्या सहाय्याने कापून नष्ट करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाने अवैध वाळू उपसा थांबविण्याचे आदेश दिलेले असतानाही काही जणांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली करून दातिवरे खाडीतून वाळू उपसा केला जात होता. याची माहिती मिळताच प्रशासनाने संयुक्त पथक तयार करून छापा टाकला.
या कारवाईदरम्यान सुमारे २० ब्रास वाळू समुद्रात सोडण्यात आली. तसेच अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी एक लाकडी बोट जागीच जाळण्यात आली. याशिवाय सेक्शन पंप गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पालघर महसूल विभागाच्या आगरवाडी सर्कल तेजल पाटील, उसरणी सजा तलाठी ज्योती गंभीरे, महसूल कर्मचारी, नौका विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बारी, पोलीस शिपाई जयदीप सांबरे तसेच केळवा सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.