रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात लोकलखाली आल्याने युवकाचा मृत्यु; भाईंदर रेल्वे स्थानकावर दुपारची घटना
योगेश पांडे / वार्ताहर
भाईंदर – मुंबई लोकलने मध्ये प्रवाशांना नेहमीच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे ट्रेनला लटकून, धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होत असून प्रवाशांचा मृत्यू होतो. बुधवारी दुपारी पश्चिम रेल्वेच्या भाईंदर रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकल ट्रेनच्या खाली एक माणूस पडल्या असल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाईंदर रेल्वे स्थानकावर दुपारी १२.०५ च्या सुमारस ही घटना घडली होती. इंस्टाग्रामवर ‘Mirabhyandarofficial’ या अकाऊंटने हा व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये एका माणसाचे पाय ट्रेन खाली दिसून येत आहेत. स्थानकावर खळबळ उडालेली ही दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या व्हिडिओमध्ये एक मृत माणूस ट्रेन खाली आला असल्याचे दिसून आले होते.
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर ही घटना घडली. प्रत्यक्ष दर्शनींने या व्हिडिओखाली कमेंट केल्या आहेत. त्यानुसार हा माणूस रेल्वे रुळावर उभा होता किंवा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा समोरून ट्रेन आली आणि हा व्यक्ती ट्रेन खाली आला. ट्रेन वेगाने जात असल्याने चालकाला ट्रेन वेळेवर थांबवणं शक्य झालं नाही. यानंतर त्यांचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला. या प्रकरणाबद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप काही माहिती दिली नाही आहे. पण या घटनेमुळे स्थानकावर बुधवारी भीतीचे वातावरण पसरले होते.
अशा घटनांमुळे रेल्वेवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. यापूर्वीच एसी लोकल ट्रेनची वाढलेली संख्या, अनियमित वेळापत्रक आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे नेहमीच लोकल १० ते २० मिनिटे विलंबाने धावत असतात. त्यात अशा घटना घडल्यामुळे वाहतूकीवर अजून परिणाम होतो.दुपारीच ही घटना घडल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात ट्रेनमधून रुळावर उतरावे लागले होते. लोकलचे डबे आधीच उन्हाने तापले असतात त्यात ट्रेन एकाच ठिकाणी थांबल्याने प्रवाशांचे आणखी हाल होतात.